Posts

Showing posts from April, 2015

पावसाळी रात

सुसाट वारा  हलती झाडे,  अन् वरतीही  वीज कडाडे  चराचरातून  फिरते आज  ऎक सखे, ती  सागरगाज  भिजलो मी  परतीच्या भिजल्या  वाटा  बघ, हाय!  किनाऱ्यावरती लाटा !! नयन तुझे  कोदंड जरी  येती माझ्या  तीर उरी  अधीर अधर  न धरवे धीर  तृष्णा ही तू  तू मज नीर  दिसे न त्याला  त्या चंद्राला, रात्र भिजुनी  झाली काळी.  विरह असे तो  पुन्हा सकाळी..!! - विजय नेटके  ©

जुनाच कडबा

जुनाच कडबा खाती ते  आणि पुन्हा रवंथ त्याची  मनुष्य ? छे छे !! स्थिती बरी हो जनावरांची  शेणाचे ते ढीग साचले  त्यात कीडे ते वळवळती  अज्ञानाच्या जटील श्रुंखला  पुन्हा पुन्हा ते अडखळती  भुते खेळती खांद्यावरुनी  घराघरातुनी त्यांची वाढ  फडताळाच्या लपले आड  विज्ञानाचे पुस्तक काढ जातींचे चौकोनी वाडे  आणि त्याची बंद कवाडे  जन- रीतींचे कुदळ फावडे  त्यात उभा, ते माणूस गाडे !! दारी आलो तुमच्या आज  मला हवी हो थोडी आग  जाळाया ते वाडे ज्यातुनी  वळवळती द्वेषाचे नाग - विजय नेटके  ©