गंगा

होय पुरातन, परी नवीनतम अशा हिमातून उगम तिचा, ती असे चिरंतन हिमालयाच्या शुभ्र कुशीतुनी ती येते, ती येते खाली कुठे भासते गौरीसम ती कुठे भासते मजला काली काळ पसरला जणू धरेवर आडवेतिडवे विशाल डोंगर त्यातुनी जाता पुढे-पुढे ती मला वाटते नितांत सुंदर कधी, कुठे, कशी घाण मिसळते? त्या घाणीचा वासही येतो त्याने माझा जीव गुदमरतो जाती-पाती सम मला भासतो सागराची ओढ तिला तिची ती एकच तळमळ कधी कोणता 'प्रवाह' येतो त्या वळणावर प्रचंड खळबळ 'यमुना' येते तीत मिसळते मिसळूनी तीही गंगा होते. प्रसरणशील अन होय प्रवाही असे पात्र ते सदा धडाडे गाळ, चिखल अन पत्थर झाडे कुणा न झाली बंद कवाडे मैदानी ती संथ वाहते तिथे तिला ना कुठली घाई सर्व तिच्या पदराला येती सर्वांची ती होते आई. -©विजय नेटके (नुकताच ऋषिकेश, उत्तराखंड येथे जाऊन आलो. हिमालय व गंगा आयुष्यात प्रथमच पाहिले तेव्हा मनात विलक्षण शांतता उतरली. गंगा मला भारत- भारतीय संस्कृती-इतिहास याचे रूपक वाटली व शब्दांची कविता झाली.)