Thursday, January 7, 2016

तू होतासच प्रतिभावान

तू होतासच प्रतिभावान
ही काजळी नंतर चढली

आयुष्याच्या निबिड अरण्यात,
आसवांच्या दवबिंदूत,
अस्तित्वाच्या तलवारीला गंज लागला.
गोठ्यात हुंदडणाऱ्या वासराला,
पायगोवा घातलास कालौघात.
उमलणाऱ्या कळ्या कुरतडल्यास,
जगण्याच्या कुत्तरओढीत.
हेच का रे तुझे शौर्य?

अंधाराला घाबरलाय तो
रवीचा किरण.
ते बघ, ते बघ !
डोंगराऐवढे  ढग, लालबुंद,
काळेकुट्ट, घनघोर ढग..
त्यात झाकोळलाय तो सुर्य
तो तू आहेस.!!





©विजय नेटके 
२ जानेवारी २०१६, नागपूर 

Saturday, December 12, 2015

वाहत राहते इंद्रायणी!!

तुकोबाची माळ, तिचा एकेक मणी
निसटला इंद्रायणीत
काळ वाहत राहिला पाण्यासारखा..
उरले फक्त तरंग.
उन्हात पाण्यावर हलल्या  सावल्या
त्याच नदीत परत नाही उतरता येत
पाणी वाहून गेलेय.
तुकोबाची माळ हरवली
उथळ-गढूळ पाण्यात..
विखुरले तिचे एकेक मणी
वाहत राहते  इंद्रायणी!!

©विजय नेटके 
नागपूर, १२ डिसेंबर २०१५
 दुपारी २ वाजता


Friday, July 17, 2015

या नभांनो, या तुम्ही

या नभांनो, या तुम्ही
कडाडणारी विदुल्लता घेउनी
अन् बरसु द्या आज पर्जन्यधारा
ओला होऊ दे कोरडा आसमंत सारा.

हॆ नभा, न ठेउनी  भान.
गडगडत  ये तुला विजेची आण
आज- आज बरसू दे तुझ्या सरी
बेभान, बेधुंद कोसळत ये तुझ्या घरी

काळ्याकभिन्न बादलांनो
वसुंधरेच्या पिल्लांनो 
पंख झाडुनी या तुम्ही..

हे नभा कोसळ आज.
आज होऊ दे च मनाची आस पुरी
खळखळून वाहु दे जलधारा
ओला होऊ दे कोरडा आसमंत सारा

ये!, ये नभा!, ये तु!, येच तु!!

अन् मिसळू दे अश्रुत पाणी!!